Tuesday, June 2, 2009

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पाहण्याची आज सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा
Monday, June 01st, 2009 AT 11:06 PM


नांदेड - अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक अगदी साध्या डोळ्यांनी पाहण्याचा सुवर्णयोग नांदेडकरांच्या वाट्याला आला आहे. मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी ०७.३४, ०७.३९ व ०७.४१ या तीन वेळी हे स्थानक नांदेडच्या उत्तर पश्‍चिम आकाशातून साध्या डोळ्यांनीही स्पष्ट दिसेल. अंतराळप्रेमींनी ही संधी गमावू नये, असे आवाहन महात्मा गांधी मिशनच्या अंतराळ व खगोलशास्त्र तंत्रशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक दरदिवशी पृथ्वीला जवळपास १६ प्रदक्षिणा घालते. मात्र, काही विशिष्ट दिवशीच आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणाहून हे अंतराळस्थानक पाहता येणे शक्‍य आहे.
मंगळवारी ही संधी उपलब्ध होणार असून आकाश जर निरभ्र असेल तर साध्या डोळ्यांनीही ते पाहता येईल.
या स्थानकाला जोडलेल्या उपकरणांवर सूर्यप्रकाश पडल्याने ते प्रकाशमान होणार असून या वेळी त्याची तेजस्विता एखाद्या ताऱ्याप्रमाणे (उणे १.२) भासेल.

आकाशातील उत्तर ध्रुवाजवळून सप्तर्षी तारकासमूह, भुतक मार्ग, वृश्‍चिक तारकासमूहाकडे, असा या अंतराळ स्थानकाचा मार्ग असेल. भुतकजवळ असताना ते अगदी स्पष्टपणे ओळखता येईल. या वेळी उत्तर क्षितीजावरून जवळपास ३७ अंश उंचीवर ते दिसणार आहे.
१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक असेल. तेव्हा ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे असेल. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे.
या स्थानकाचे पृथ्वीजवळ असतानाचे अंतर ३५० किलोमीटर एवढे असते. तेव्हा ते साध्या डोळ्यांनी पाहणे शक्‍य आहे. तासाला २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

पृथ्वीवरील गुरत्वीय बदलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. वजन विरहीत अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल, जेणेकरून मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.

मूळ अंतराळस्थानकाला आतापर्यंत १४ वेगवेगळ्या उपकरणांनी जोडलेले आहे. या अंतराळ स्थानकात आजवर भारतीय वंशाच्या कल्पना चावला व त्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी काम केले आहे. कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुनीता विल्यम्स यांनी सलग सहा महिने या स्थानकात वास्तव्य करण्याचा विक्रम केला आहे, असेही श्री. औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.



0 comments:

Post a Comment

Post a Comment